प्रेमाच इंटरनेट
सकाळचे नऊ वाजले होते. कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला भेटण्यासाठी साडेदहाची वेळ दिल्यामुळे आता पूर्ण दीड तास मला माझ्या आवडीच्या लेखकाचे पुस्तक वाचता येणार होते. वाचायला सुरुवात करणार एवढ्यात ‘दिलासा’चा फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती एक तरुण मुलगी होती. एखादा वाघ मागे लागल्यागत धापा टाकत बोलत होती. ‘‘सर, मी महाराष्ट्रातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकते आणि सध्या एका गंभीर समस्येमध्ये फसल्यामुळे तुम्हाला तातडीने भेटायला येण्याची इच्छा आहे.’’ अत्यंत उत्तेजित झालेल्या आवाजात तिने शक्य तितक्या लवकर तिचं बोलणं पूर्ण केलं व माझ्या उत्तराची वाट बघू लागली. तिला आमंत्रण देण्याशिवाय पर्याय नव्हता. कॉलेजकन्यका दहा मिनिटांतच ‘दिलासा’मध्ये पोहोचली. थोडाही वेळ वाया न घालवता तिने तिची कर्मकहाणी कथन करायला सुरुवात केली. ‘
‘इंटरनेटवर चॅट करणं हा माझा अत्यंत आवडता टाइमपास आहे सर.
आजपर्यंत या प्रकारे होणा-या गप्पागोष्टींना मी मुळीच सीरियसली घेतलं नव्हतं. पण मध्य प्रदेशातील एका मुलाच्या बाबतीत मात्र चॅटद्वारे झालेल्या ओळखीचं रूपांतर प्रथम मैत्रीत व नंतर प्रेमात झालं. प्रेम सर्वप्रथम त्याने व्यक्त केलं व त्यावर मीही गंभीरपणे विचार करू लागले. बरेच दिवस नेटवर प्रेमालाप झाल्यानंतर त्याने एक किमती मोबाइल फोन मला गिफ्ट दिला आणि त्याचे वेळी-अवेळी मला कॉल्स येऊ लागले. लवकरच त्याने माझ्या कॉलेजमध्ये येऊन मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली व त्याप्रमाणे तो मला भेटलाही. त्याची भेट झाल्यानंतर, त्याचे स्त्रियांबद्दलचे विचार ऐकल्यानंतर व त्याची बोलण्याची पद्धत बघितल्यानंतर या मुलाची आपला जीवनसाथी होण्याची योग्यता नाही हे माझ्या लक्षात आलं. मी त्याला नकार देण्याचा विचार करते आहे, पण त्याने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर, या भीतीने माझी झोप उडाली आहे. या सर्वातून सुटका करून घेण्यासाठी मला काही उपाय सुचवा.’’
तिचं प्रेमायण ऐकल्यानंतर तिला उपाय सुचवण्याऐवजी तिची अत्यंत वाईट शब्दांत कानउघाडणी करावी आणि तिच्या मूर्खपणाबद्दल तिला जाब विचारण्याची इच्छा झाली. पण तसं केलं असतं तर डोक्यात राख घालून तिने तिच्या जिवाचं काही बरंवाईट करून घेतलं असतं. तिला तिच्या समस्येतून बाहेर काढून दिलासा देण्यासाठी नकार देण्याच्या कलेचा वापर करणे हा एकमेव पर्याय होता. तिला दिलेल्या सल्ल्यानुसार तिने त्या मुलाला स्पष्टपणे नकार दिला नाही. पण तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण आटोपल्यानंतर उच्च शिक्षण व त्यानंतर एखाद्या मोठ्या कंपनीत चांगला जॉब यासाठी त्याने तिच्यासाठी कमीत कमी सात ते आठ वर्षे थांबावं, असं गोड शब्दांत सुचवलं.
अपेक्षेनुसार तो इतकी वर्षं थांबायला तयार नसल्यामुळे त्यानेच तिला नकार दिला व सुंठेवाचून खोकला गेला! या मुलंं-मुली असं का वागतात? ज्याचं आयुष्यात कधी तोंडही बघितलं नाही, जो सुशिक्षित व सुसंस्कृत आहे की नाही हे माहीत नाही असा कुणीतरी एक पूर्णपणे अनोळखी मुलगा इंटरनेटचा दुरुपयोग करून एका तरुण मुलीवर प्रेमाचं जाळं फेकतो व तीही त्याने दिलेली भेटवस्तू स्वीकारून व त्याची कॉलेजमध्ये भेट घेऊन त्याच्या जाळ्यात फसण्याचा मूर्खपणा करते याला काय म्हणावं? सावजाच्या शोधात फिरणा-या लांडग्यांची संख्या वाढते आहे व ते आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करताहेत हे माहीत असूनही मुली प्रेमाचे गोडवे गात स्वत:च्या अत्यंत मौल्यवान आयुष्याच्या चिंध्या का करून घेतात? चुकीच्या माणसावरून जीव ओवाळून टाकण्याऐवजी एखाद्या चांगल्या गोष्टीत स्वत:ला झोकून देण्यातच आयुष्याचं ख-या अर्थाने सार्थक आहे हे तरुण-तरुणींच्या ज्या दिवशी लक्षात येईल तर ‘मेरा भारत महान’ हे कौतुकाने भिंतीभिंतीवर मुद्दाम रंगवण्याची गरजच भासणार नाही!
Marathi kavita,Scraps for orkut,Shayari,sms ,मराठी कविता,चारोली ,उखाणे,शायरी ,आणि भरपूर काही,Marathi Kavita Blog a collection of more 500 marathi poems,All about Marathi world

Post a Comment